मुलांना खेळण्यासाठी हजारोंचा खर्च

कित्येक आंतरराष्ट्रीय ब्रॅंडही उतरले मैदानात
प्लेग्रुपचा सुळसुळाट

पिंपरी-  ज्या वयात शिक्षण म्हणजे काय? हे ही माहीत नसते त्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण कसे देण्यात येणार याबाबतच्या चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहेत. मे महिन्याचा पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत अडीच ते तीन वर्षांच्या चिमुकल्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख वेगवेगळ्या शाळा आणि प्रीस्कूल्सनी ठरवली आहे. मुलांना शाळेची सवय लागावी आणि वेळेपूर्वीच आपले मूल सर्वांत शहाणे आणि हुशार व्हावे, या भाबड्या मानसिकतेने चिमुकल्यांच्या पाठीवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादण्यासाठी पालक तयारच आहेत. याचाच फायदा घेत कित्येक बहुराष्ट्रीय कंपन्या या प्री स्कूल शिक्षण “व्यवसाया’त उतरल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात “प्ले ग्रुप’च्या शाळांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या आपल्या चिमुकल्याला कोणत्या प्ले ग्रुपमध्ये घालावे, यासाठी पालकांची शहरात मोठी लगबग दिसून येत आहे.
प्ले ग्रुप याचा शब्दशः अर्थ पाहिल्यास असे वाटते की येथे मुलांना खेळण्याची सूट मिळत असावी. परंतु रोज दोन तास खेळण्यासाठी वीस हजार ते एक लाख रुपये कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

न्यायालयाने मुलांना शाळेत घालण्याबाबत वयाच्या कडक अटी घातलेल्या असताना देखील प्ले ग्रुप आणि नर्सरी नावाची पळवाट काढण्यात आली आहे. प्ले ग्रुपमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलेल्या पालकांना येथील समन्वयक समजवतात की त्यांच्या मुलांना कुठल्या प्रकारचे आणि कुठल्या पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या देशांची नावे घेऊन आपण तेथील शिक्षण पद्धतीचा प्रयोग तुमच्या मुलांवर करणार असल्याचे स्पष्ट सांगितले जाते. पालक देखील समन्वयकाचे बोलणे ऐकून हुरळून जातात आणि या प्लेग्रुपमध्येच आपल्या चिमुकला किंवा चिमुकलीचे करियर घडेल अशा कल्पना विश्‍वात हरवतात.

लाखो रुपयांची फ्रेंचाइजी
पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी प्ले ग्रुपचे खूप मोठे पेव फुटले आहे. कधी न थांबणारा आणि भरपूर नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या रुपात प्ले ग्रुपकडे पाहिले जात आहे. यामुळे प्ले ग्रुपमध्ये आपसात स्पर्धा देखील सुरू झाली आहे. या स्पर्धेमुळे “फी’चे दर कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. कित्येक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या फ्रेंचाइजी देऊ करत आहेत. किमान दोन ते तीन हजार चौरस फुट तळमजल्यावर जागा आणि बारा लाखांहून अधिक गुंतवणूक करण्याची क्षमता असलेली कोणतीही व्यक्‍ती या फ्रेंचाइजी घेऊ शकते आणि चिमुकल्यांच्या बालपणाशी खेळू शकते.

एवढी गुंतवणूक केल्यावर साहजिकच मुलांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचा आकडाही फुगू लागतो. नर्सरीसाठी पालकांकडून वर्षभरासाठी वीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत फी आकारात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सरार्सपणे अनेक संस्थाचालक नियमांचे उल्लंघन करुन प्ले ग्रुप चालवित असल्याचे आढळून आले आहे. शहरातील प्ले ग्रुप मध्ये सरार्सपणे अडीच ते चार वयोगटातील बालके शिक्षण घेत आहेत. स्वतंत्र प्ले ग्रुप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असल्याने आतापर्यंत पहिली ते दहावी किंवा बारावी पर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या शाळांनी देखील आता यात उडी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत ज्या शाळा पाच ते सहा हजार रुपयांमध्ये नर्सरी आणि ज्युनियर केजी, सीनियर केजीचे शिक्षण देत होत्या, त्या देखील आता वीस हजारांपेक्षा अधिक रक्‍कम मागू लागल्या आहेत. काही शाळांनी एखाद्या वर्गाचा हॉल तयार करुन लाखो रुपये मिळवून देणारा प्ले ग्रुप सुरू केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.