पर्यावरणीय समस्येचे मुले बनताय “शिकार’

स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज


बांधकाम मजूर, कचरावेचकांच्या मुलांवर सर्वाधिक परिणाम


देशभरातील 38 टक्‍के बालके विविध पर्यावरणीय आजारांचे ठरतायेत बळी

पुणे – बालदिन साजरा करतानाच लहान मुलांच्या सुरक्षित आणि सुदृढ भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे. सध्या प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्येमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, देशभरातील सुमारे 38 टक्‍के बालके ही विविध पर्यावरणीय आजारांचे बळी ठरत आहेत. त्यामुळेच लहान मुलांसाठी स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्‍त करण्यात आली आहे.

शहरातील “तेरे देस होम’ या जर्मन संस्थेसह निर्माण, न्यु व्हिजन, कष्टकरी पंचायत या संस्थांतर्फे वंचित समाजातील मुलांसाठी काम केले जाते. बांधकाम मजुरांची, कचरावेचकांची, भटक्‍या विमुक्‍त समाजातील मुलांचे राहणीमान उंचावण्यासाठी या संस्था कार्य करतात. नुकतेच संस्थेतर्फे वंचित मुलांच्या समस्या आणि हक्‍क याबाबत एक अहवाल प्रकाशित करण्यात आला असून, यामध्ये मुलांच्या पर्यावरणीय हक्‍कांबाबत चिंता व्यक्‍त करण्यात आली आहे. या अहवालानुसार वंचित समाजातील मुलांवर पर्यावरणीय समस्यांचा परिणाम सर्वाधिक होत असल्याचे दिसून येते.

याबाबत “तेरे देस होम’ या संस्थेच्या स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, “आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या मुलांना चांगल्या दर्जाचे अन्न, पाणी मिळत नाही. परिणामी दूषित अन्न-पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा सामना या मुलांना करावा लागतो. अनेकदा ही मुले राहतात तो परिसर म्हणजे कचराकुंडीच असतो. त्या ठिकाणी योग्य कचरा व्यवस्थापन होत नाही. बहुतांश मुले ही विविध प्रकारच्या कामांत गुंतलेली असतात. त्याठिकाणी असलेल्या रसायनांचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच या मुलांचे आरोग्य सुदृढ राहत नाही.

जागतिक आरोग्य संस्थेनेदेखील 2018 साली आपल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. या अहवालानुसार भारतातील बालमृत्युमध्ये 4 मुलांमधील 1 मुल हे पर्यावरणीय समस्येचे शिकार बनल्यामुळे मृत्युमुखी होते.’ चांगले पर्यावरण आणि सुदृढ आरोग्य हे या मुलांचे देखील हक्‍क आहे. मात्र, ही मुले या हक्‍कापासून वंचित राहतात. अशा मुलांच्या हक्‍कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये आपल्या हक्‍कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणखी प्रयत्न होणे आवश्‍यक असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

या परिसरातील मुलांवर सर्वाधिक परिणाम
झोपडपट्टीत राहणारी मुले
नद्यांच्या काठावर राहणारी मुले
रस्त्याच्या कडेला राहणारी मुले
खाणकाम, रासायनिक शेतीत काम करणारी मुले
औद्योगिक परिसराजवळ राहणारी मुले –

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here