सातारा -केंद्र सरकारने पाच ते बारा वयोगटातील मुलांना लस देण्याबाबत निर्णय घेतला असून लसीकरणाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा स्तरावर सूचना मिळाल्यानंतर लस दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने संबंधित वयोगटातील मुलांची आकडेवारी एकत्रित करण्यास सुरुवात झाली आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून करोनाला रोखण्यात यश आले आहे. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून विविध वयोगटातील लसीकरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे. या मागील टप्पा 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील लसीकरण मोहीमेने सुरू झाला होता. या टप्यातील पात्र वयोगटाची जिल्ह्यात एक लाख 27 हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. यामधील पहिला डोस 74 हजार 864 मुलांना देण्यात आला असून दुसरा डोस 22 हजार 357 मुलांना देण्यात आला आहे. आता पाच ते बारा वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांना कार्बेव्हॅक्स ही लस दिली जाणार आहे.
त्यादृष्टीने लसीकरणासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याआधी विद्यार्थी वयोगटाचे लसीकरण शाळा व महाविद्यालयांमध्ये करण्यात आले होते. त्याच पध्दतीने पाच ते बारा वयोगटाचे लसीकरणही शाळांमध्ये होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाकाकडून याबाबत पावले उचलण्यात येत आहेत.
पाच ते बारा वयोगटातील लसीकरण मोहीम राबवण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वयोगटातील मुलांची आकडेवारी एकत्रित केली जात आहे. जिल्ह्यात करोना लसीकरण मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या वयोगटातील मोहिमही निश्चित यशस्वी होईल.
– डॉ. राधाकिशन पवार
(जिल्हा आरोग्य अधिकारी)