अहमदाबाद – देशात एकीकडे करोना संसर्ग थैमान घालत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या स्थितीतही वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना बर करत आहेत. मात्र आता म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस आजाराने डोक वर काढलं असून करोनामधून सुटले तरी रुग्ण या रोगाचे शिकार होत आहे. याआधी हा आजार वृद्ध आणि इतर आजार असणाऱ्यांना होत असल्याचे सांगण्यात येत होते. आता हा आजार लहान मुलांपर्यंत पोहोचला आहे.
अहमदाबादमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. लहान मुलाला ब्लॅक फंगसची लागण होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
मुलाचा ब्लॅक फंगस रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाला अहमदाबादच्या अॅपल चिल्ड्रन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला यापूर्वी करोनाची लागण झाली होती. ब्लॅक फंगस वगळता या मुलाला कोणताही आजार नसल्याचं सांगण्यात आलं.
या मुलाला आणि त्याच्या आईला करोनाची लागण झाली होती. मात्र त्याची आई करोनाच्या संकटातून वाचू शकली नाही. त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा करोनातून बरा झाला होता. मात्र दीड महिन्यानंतर मुलामध्ये ब्लॅक फंगसची लक्षण दिसून आली. त्यानंतर चाचणी पॉझिटीव्ह आली. आज अखेर मुलावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.