- पालकानो, थोडी सावधानता बाळगा ः 10 हजारांहून अधिक बाळांना करोनाची लागण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहारामध्ये करोनाचा विस्फोट झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या शनिवार (दि. 10) 1 लाख 65 हजारांवर पोहोचली असून, त्यामध्ये 10 हजारांहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरातील करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये योग्य खबरदारी घेणे हाच त्यावरील उपाय आहे. घरातील कर्त्या माणसांपुरता असलेला हा करोनाचा संसर्ग आता लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये आढळून येत आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांमध्ये लहान मुलांमध्ये करोना संसर्ग आढळून येत आहे. त्याचा घातक परिणाम अद्याप कोणावर झाला नाही.
मात्र, खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 0 ते 11 व 12 ते 21 या वयोगटांतील मुलांमध्ये करोनाची लक्षणे सौम्य स्वरूपात आढळत आहेत. ही सर्व मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आल्यामुळे बाधित झाले आहेत. बऱ्याचदा आई-वडिलांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र, ते पॉझिटिव्ह असतात. अशावेळी मुलांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यांची वेळीच तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवावे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनीही सतर्क रहावे. शहरातील तपासणी केंद्रावर गेल्या आठवडाभरात लहान मुलांची तपासणी करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये 8 ऑगस्ट 2020 या दिवशी 0 ते 12 वर्ष वयोगटातील 2436 बाळांना करोनाची लागण झाली होती. तर 13 ते 21 वर्ष वयोगटातील 2552 किशोरवयीन मुलांना लागण झाली होती. दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत 0 ते 12 वर्ष वयोगटातील 10,705 बाळांना करोनाची लागण झाली आहे. तर 13 ते 21 वर्षीय 12,779 मुलांना करोनाची लागण झाली आहे.
काय आहेत लक्षणे
लहान मुलांमध्ये सध्या करोनाची लक्षणे अतिशय सौम्य आहेत. काही मुलांमध्ये तर ही लक्षणे दिसतही नाहीत. लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत. मात्र, यामध्ये उपचारास उशीर केल्यास आजार गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे.
घरी लहान मुले असतील तर हे कराच
1) घरी आल्यावर अंघोळ करावी.
2) शक्य होईल तेवढ लहान मुलांपासून दूर रहावे.
3) घरीही मास्क वापरावा. दोन वर्षांपुढील मुलांनीही मास्क वापरावा.
4) घरी कोणी पॉझिटिव्ह आल्यास मुलांना होम आयसोलेशन करावे, किंवा नातेवाइकांच्या घरी पाठवावे.
5) बाधितांच्या संपर्कात आल्यास तिसऱ्या दिवशी करोनाची चाचणी करून घ्यावी.
6) पॉझिटिव्ह अहवाल आल्यास तातडीने बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
7) रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हायप्रोटीन डाएट, फळे व भरपूर पाणी प्यावे.
8) मुलांना बाहेर घेऊन जाऊ नये.
9) ग्रुपमध्ये खेळू देऊ नका.
लहान मुलांना करोना झाला तरी त्यांच्यामध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता आपल्या लहान बाळांची शक्य होईल तेवढी काळजी घ्यायची आहे. शक्यतो मुलांना बाहेर कुठे घेऊन जाऊ नये. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समजल्यावर तीन दिवसांत चाचणी करून घ्यावी. घरामध्ये स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन केले जावे. बाहेरून आल्यानंतर लगेच मुलांजवळ जाऊ नये, अशा साध्या गोष्टींनीही आपण लहान मुलांना करोनापासून दूर ठेवू शकतो.
– डॉ. अभय तांबिले, सचिव, निमा संस्था