बालकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुण्यात बालस्नेही पोलीस ठाणे

पोलिसांचा उपक्रम प्रशंसनीय : लष्कर पोलीस ठाणे आवारात कामकाज

पुणे  – “बालस्नेही पोलीस ठाण्यात येणाऱ्या बालकांना विश्वास देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामान्य तक्रारदारांना विश्वास देऊन त्यांच्या तक्रारींचे निराकरण करायला हवे,’ असे आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी सोमवारी सांगितले.

 

लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील एका इमारतीत बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संचालक कॅरोलीन अडोर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महिला-बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

 

करंदीकर म्हणाले, “बालकांना विश्वास देण्याचे काम तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम बालस्नेही पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. पोलिसांचा उपक्रम प्रशंसनीय आहे. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात बालकांची संख्या मोठी आहे.’

 

“बालविवाह, बालकांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे विचारात घेऊन हॉप फॉर चिल्ड्रेन या संस्थेकडून काम करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करण्यात येत आहे, असे कॅरोलीन अडोर यांनी सांगितले.

 

पोलीस आयुक्त म्हणाले, “करोना संसर्गामुळे बालस्नेही पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यास काहीसा विलंब झाला होता. बालकांबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सामान्यांना विश्वास देण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.’  पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी प्रास्ताविक केले. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आभार मानले.

 

राज्यातील पहिलाच उपक्रम

बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन बालस्नेही पोलीस ठाणे स्थापन केले असून बालकांच्या तक्रारींचे निराकरण, गंभीर गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन तसेच बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न करण्यात येणार आहेत. बालकांच्या तक्रारींच्या निराकरणाचे काम या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाईल. हे राज्यातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.