नेवाशात प्रवरा नदीपात्रात पडून मुलाचा मृत्यू

नेवासा – पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार तालुक्‍यातील खलालपिंप्री येथे आज सकाळी घडला. संदीप बाबासाहेब चोपडे (वय 14) असे मयत तरुणाने नाव आहे.

याबाबत लक्ष्मण मारुती चोपडे (रा. पाचुंदा, ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पाचुंदा (ता. नेवासा) येथील बाबासाहेब चोपडे हे मेंढ्या चारण्यासाठी खलालपिंप्री येथे कुटुंबासोबत राहात आहेत. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा संदीप चोपडे (वय 14) हा पाणी आणण्यासाठी प्रवरा नदीकाठी गेला होता.

पाणी भरताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. संदीप परत न आल्याने बाबासाहेब चोपडे यांनी त्यांचे चुलते लक्ष्मण चोपडे यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यावेळी लक्ष्मण चोपडे व नातेवाईक त्वरित खलाल पिंप्री येथे दाखल झाले. त्यानंतर सर्वांनी संदीपचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह प्रवरा नदीत सापडला. मयत संदीप याच्यामागे आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.