सीडीएस रावत यांचे आदेश : दि.25 रोजी पद स्वीकारणार
पुणे – लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड झाली आहे. दि.25 जानेवारी रोजी ते लष्कर उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या अध्यक्षतेखाली सैन्य व्यवहार विभागामार्फत जारी केलेल्या वरिष्ठ लष्करी नेमणुकीचा हा पहिला आदेश आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
जनरल मनोज नरवणे यांनी लष्कराच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लष्कर उपप्रमुखपद रिक्त झाले होते. यानंतर या पदावर कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पदासाठी उत्तर मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी या दोन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी लेफ्ट. जनरल सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
लेफ्ट. जनरल सैनी यांचा परिचय
पंजाबमधील कपुरथला येथील आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी प्रबोधिनीतील तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी डेहराडून येथील नॅशनल मिलिटरी ऍकॅडमी येथील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर जून 1981मध्ये लष्कराच्या जाट रेजिमेंटमध्ये ते रुजू झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे माजीप्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांच्याकडून दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. सैनी यांच्या नेतृत्वाखाली सांगली, कोल्हापूर, केरळ आणि कर्नाटक येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुण्यात ऑपरेशनल सेंटरची स्थापना करण्यात आली होती. भारत-रशिया यांच्या दरम्यान नुकताच झालेला “इंद्रा’ हा संयुक्त लष्करी सराव, भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान झालेला युद्धसराव तसेच राजस्थान येथे झालेला सिंधू सुदर्शन युद्ध सराव अशा महत्त्वपूर्ण मोहीम पार पडल्या आहेत.