मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उच्चस्तरीय अधिकारी महाबळेश्‍वरात

सहकुटुंब खासगी दौरा; राजभवनात मुक्‍काम, अखेर हेलिकॉप्टर उतरविण्यास जागा मिळाली

महाबळेश्‍वर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारपासून (ता. 31) तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यासाठी महाबळेश्‍वर मुक्कामी येणार असून येथील राजभवनात त्यांचा मुक्काम असणार आहे.
वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरणार असल्याने त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांचे उच्चस्तरीय अधिकारी व शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. मोठे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जागेची अडचण होती.

प्रशासन तीन दिवस यासाठी जागा शोधत होते. अखेर वेण्णा लेक पठारावर हेलिकॉप्टर उतरविण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महाबळेश्‍वरवर विशेष प्रेम होते. दरवर्षी सहकुटुंब आरामासाठी ते येत असत. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून महाबळेश्‍वरमध्ये आरामासाठी येण्याची ठाकरे कुटुंबाची परंपरा असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर विश्रांतीसाठी ठाकरे कुटुंब गेली अनेक वर्षे महाबळेश्‍वर येथे येतातच.

यंदा राज्यातील उदभवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर महाबळेश्‍वरला आले नाहीत. निवडणुकीनंतर एका महिन्यात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराच हाती घेतली. परंतु, आता आपल्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी तीन दिवसांचा वेळ काढला असून ते सहकुटुंब येथे येत आहेत. तसेच गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीच्या विवाह समारंभ येथील “कीज’ रिसॉर्टमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणार असून ते या विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहेत.

महाबळेश्‍वरच्या वेण्णा लेक पठारावर हेलिकॉप्टर उतरविण्याची तयारी सुरु असून उद्या शुक्रवारी दुपारी मुंबईतील जुहू येथून वेण्णालेक पठारावर उध्दव ठाकरे यांचे कुटूंबासह आगमन होईल. राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रथमच महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, महसूल प्रशासन, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे.

उद्धव ठाकरे दरवेळी छोट्या हेलिकॉप्टरने येथे येत असत. येथे छोटी हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. परंतु यावेळी ते मोठ्या सिक्‍स सिटर हेलिकॉप्टरचा वापर करणार असून या हेलिकॉप्टरचे पंखे अधिक मोठे असल्याने अशा मोठ्या आकाराच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी जागा शोधण्याची तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागली.

गेले तीन दिवस येथे जागेचा शोध घेतला जात होता. पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास वनविभागाने बंदी केल्याने जागेची मोठी अडचण झाली आहे. बुधवारी सायंकाळी वेण्णा लेक येथील पठारासह महाबळेश्‍वर, पाचगणी रस्त्यावर असलेल्या “वेलोसिटी’मधील जागेचीही पाहणी करण्यात आली. परंतु, जागा निश्‍चित होत नव्हती. मात्र, आता वेण्णा लेक पठारावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी महाबळेश्‍वरमध्ये दाखल होत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.