सातारा -मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच साताऱ्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी भेट घेतली होती. मात्र, शुक्रवारी ना. शिंदे यांच्या घरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बराचवेळ गुप्तगू केले. नवे सरकार आल्यानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केले. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ना. एकनाथ शिंदे गुरूवार, शुक्रवार या दोन दिवशी त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) या मूळगावी आले होते.
प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मूळगावी ठाण मांडले होते. दरम्यान, मुख्यमंत्री अनेक अधिकाऱ्यांना भेटत होते. तसेच त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा करत होते. परंतु, दि. 12 रोजी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मनोजकुमार लोहिया, अजयकुमार बन्सल, दिक्षीत गेडाम या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी बराचवेळ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात मूळ शिवसेना व शिंदे गट यांच्यातील सुरू असलेला संघर्ष तसेच राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सुरू असलेली लगबग यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
=================