मुंबई : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने एसआयटीतील 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम आहेत. मात्र, एसआयटीमधील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
‘या’ अधिकाऱ्यांची केली उचलबांगडी
विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते यांची SITमधून गच्छंती करण्यात आली आहे. SIT समितीमधील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचे देशमुखांच्या कुटुंबीयांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नवीन SIT मध्ये कोणाचा समावेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या एसआयटी गाठीत करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या एसआयटीमध्ये बसवराज तेली हे प्रमुख आहेत. तर, डीवायएसपी किरण पाटील, डीवायएसपी अनिल गुजर, पोलीस निरीक्षक अक्षय ढिकणे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, पोलीस हवालदार शर्मिला साळुंखे, पोलीस हवालदार दीपाली पवार यांचा समावेश आहे.