मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी जाहिर केली 5 लाखांची मदत

मुंबई – मुंबईतील मालाड येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचे मंगळवारी विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. विरोधकांच्या टिकेच्या भडीमारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्पेै 5 लाख रूपयांची मदत जाहिर करतानाच मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आणखी 5 लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी दिवसभर पडलेल्या पावसानंतर मालाड येथील तसेच पुणे, कल्याण, नाशिक या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. मालाडमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेजवळच्या संरक्षक भिंतीजवळ पाणी अडलं आणि नंतर ती भिंत कोसळून ते पाणी खालच्या भागामध्ये शिरले. त्यामुळे ही घटना घडली आणि यामध्ये 18 लोक मृत्यूमुखी पडले.

या घटनेत 75 जण जखमी झाले असून 14 लोकांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या घटनेची आपण सकाळपासून माहिती घेतली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व सर्व व्यवस्थेमध्ये स्वत: लक्ष घातले. नंतर स्वत: रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात भेट देऊन मुंबईची सर्व परिस्थिती जाणून घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे जिल्हयातील हवेली तालुक्‍यातील आंबेगाव येथेही दुर्घटना झाली आहे. सिंहगड इन्स्टट्यिूटच्या भिंतीवर झाडे कोसळली. त्यामुळे झोपड्यांतील 6 कामगारांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. ते मध्यप्रदेश व छत्तीसगढ मधील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आवश्‍यक ती संपूर्ण मदत शासन करेल. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोंढवा दुर्घटनेनंतर दिलेल्या निर्देशानुसार, पुणे महापालिकेने 267 साईटची पाहणी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कल्याण दुर्गाडी किल्ला येथे शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाशिकच्या सातपूर येथे पाण्याची टाकी कोसळून 3 जण ठार झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.