मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कारण मात्र गुलदस्त्यातच!

नवी दिल्ली : देशात नुकत्याच पाच राज्यांच्या निवडुका पार पडल्या त्यात भाजपाला म्हणावा तसा विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आता भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयीची माहिती अजूनही समोर आली नाही.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यास योगी आदित्यनाथ अपयशी ठरल्याचा ठपका सर्व स्तरातून  ठेवला जात आहे. यामुळे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते. या दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय महत्वपूर्ण चर्चा झाली? हे अजूनही समोर आले नाही.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेश जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.