चंदीगड – हिसार येथे रविवारी शेतकऱ्यांवर जो अमानुष लाठीहल्ला करण्यात आला त्या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मोठी गर्दी जमवून एका कोविड सेंटरचे उद्घाटन करताना कोविड प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोपही कॉंग्रेस पक्षाने केला आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा कुमारी शेैलजा यांनी हे निवेदन प्रसिद्धीला देताना मुख्यमंत्र्यांकडून माफीचा जोरदार आग्रह धरला आहे.
खट्टर हे ज्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी रविवारी हिसार येथे येणार होते तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर जो अमानुष लाठीहल्ला करण्यात आला त्याचा अन्यही राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे.
यावेळी झालेल्या संघर्षात काही पोलिसांसह एकूण 20 जण जखमी झाले आहेत. हे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या दिशेने जात असल्याने त्यांना रोखण्यासाठी हा लाठीहल्ला करावा लागला, असे पोलिसांनी म्हटले आहे.