-->

विदर्भवासियांसाठी मुख्यमंत्र्यांचं ठरलं ! दिला ‘हा’ शब्द

मुंबई – करोनाच्या संकटामुळे नागपुरात अधिवेशन घेऊ शकलो नाही, याची खंत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भात येणं, राहणं होतं. विदर्भवासियांच्या व्यथा, प्रश्न, वेदनांची जाणीव होते. त्यातून मार्गही निघतो. मात्र यापुढे असं होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भवासियांकडे अधिक लक्ष देणार असल्याचे सांगत एक वचनही दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपुरात आज विधिमंडळ सचिवालय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असल्याचं सांगितले. त्याचवेळी तंत्रज्ञानामुळे माणसं मात्र दूर जात असल्याची खंतही व्यक्त केली.

उपस्थितांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांना आवाजाची अडचण येत होती. त्याचवेळी त्यांनी ‘नागपूरवाले मला म्यूट करतायत की, काय ? असा मिश्किल प्रश्न विचारला. गेल्या हिवाळी अधिवेशनात आपण सर्वजण तिथे होतो. तेथील विधीमंडळाच्या वास्तूला एक इतिहास आहे. अशा वास्तुमध्ये अधिवेशन होत असताना तेवढ्या काळापुरतं कार्यालय चालू ठेवणं योग्य नव्हतं. पण आता बाराही महिने कार्यालय चालू राहील, असं ठाकरे म्हणाले.   

दरम्यान करोनाने एक नवी पद्धत आपल्याला दिली आहे. तंत्रज्ञानामुळे कोणीही कुठूनही बोलू शकतो. लंडन, अमेरिकेतील माणूसही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकला असता. या प्रणालीमुळे जग जवळ आलं आहे. पण माणसं दूर जात नाहीत ना हा एक मोठा प्रश्न आहे. ही माणसं आपण दूर जाऊ देणार नाही,” अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.