मुंबई – कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक असल्याचे मुख्यमंत्री शोक व्यक्त करताना म्हणाले.
‘मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी 1 वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.