मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी – रामदास आठवले

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. सरनाईक यांची सूचना योग्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही कॉंग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र यावे.

कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे.

शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही. सरनाईक यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी या पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी, असेही ते म्हणाले.

आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास – राऊत
एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल, तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्र खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. हा गंभीर आरोप आहे.

आता विनाकारण त्रास कोण कुणाला देत आहे? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे, अस म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.