समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘हा’ मार्ग लवकरच वाहतूकीसाठी होणार खुला

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुर ते मुंबई या दरम्यान बांधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या महामार्ग प्रकल्पातील नागपुर ते शिर्डी या टप्प्याचे काम लवकरच पुर्णत्वाला जात असून हा मार्ग 1 मे 2021 रोजी वाहतुकीला खुला केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

त्यांनी आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव-खांडेश्‍वर मार्गाची तसेच शिवणी ते रसुलपुर मार्गाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या महामार्गाला हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पातील अमरावती जिल्ह्यातील एकूण मार्ग 74 किमीचा आहे. त्या मार्गावरील 6 किमी भागात प्रवास करून त्यांनी कामाच्या दर्जाची पहाणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की करोना काळातही आम्ही या महामार्ग उभारणीचे काम थांबु दिले नाही. त्यामुळे ते नियोजित वेळेत पुर्ण होण्यास सहाय्यभुत ठरणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद प्रकल्प असेल असे नमूद करून ते म्हणाले की नागपुर ते शिर्डी हा पहिला मोठा टप्पा 1 मे 2021 पासून सुरू केला जाईल. आणि एक वर्षाच्या काळात संपुर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण केले जाईल असेही त्यांनी नमूद केले.

हा 701 किमीचा आठ पदरी महामार्ग आहे. 55 हजार कोटी रूपये खर्चुन त्याचीं उभारणी केली जात आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यातून जात असून त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या विकासालाही मदत होणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपुर हा प्रवास केवळ 8 तासांत करता येणार आहे. सध्या या प्रवासाला 18 तास लागतात. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पहाणीच्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे, यशोमती ठाकुर, संजय राठोड, हे मंत्री व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.