मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावर…! राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.  सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे चित्र पाहायला मिळत होते. त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात पत्रावरुनही संघर्ष झालेला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवळण्याचा प्रयत्न केला, असे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

दरम्यान, या भेटीदरम्यान राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 नावांच्या यादीवर चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली असावी असाही अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.

मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी राजभवानावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी 9.30 ला राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील संबंध ताणलेले असताना, मिलिंद नार्वेकर आणि राज्यपाल यांची आधी भेट होणं याला विशेष महत्व आहे. मिलिंद नार्वेकर हे 9.30 च्या आसपास राजभवनावर गेल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटीची वेळ निश्चित केल्याचे  सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री 12.30 च्या सुमारास राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्याच्या काही वेळ आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारींना शुभेच्छा दिल्या.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.