मुंबई – महाराष्ट्रात करोना फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची शिवसेनेने मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. विशेषत: मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना शिवसेनेने त्यांचा उल्लेख राज्याचे फॅमिली डॉक्टर म्हणून केला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली. मात्र, मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यापार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. करोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्ण अंमलबजावणी राज्य करत आहे. सध्याच्या संकट काळात राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. ठाकरे या संकटकाळात जणू कोविडॉलॉजिस्टच बनले आहेत. त्यांनी राज्याला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. देशातील मन हेलावून टाकणारी छायाचित्रे आणि बातम्या जगभरात प्रसिद्ध होत आहेत. मात्र, त्यात महाराष्ट्र दिसत नाही. त्याचे श्रेय ठाकरे यांना नाही द्यायचे; तर कुणाला, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
केंद्र सरकार आता जे करू इच्छिते; त्याची सुरुवात महाराष्ट्राने आधीच केली. महाराष्ट्राने केलेल्या प्रयोगांची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत आहे, असे नमूद करत अग्रलेखातून नामोल्लेख टाळून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ठाकरे यांनी उगीचच हिंडणे-फिरणे बंद केले. फालतू राजकारणाचे लॉकडाऊन केले. त्यांनी संपूर्ण लक्ष करोना संकट निवारणावर केंद्रित केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही महाराष्ट्राची पाठ थोपटण्याचा मोह आवरता आला नाही, अशी टिप्पणी शिवसेनेने केली आहे.