मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी आज आमने-सामने

मुख्यमंत्री ठाकरे जाणार पंतप्रधानांच्या स्वागताला


पोलीस महासंचालक परिषदेला राहणार उपस्थित

पुणे – देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणांचे प्रमुख आणि सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय वार्षिक परिषद शुक्रवारपासून पुण्यात होत आहे. परिषदेच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा येथील बाणेर परिसरातील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) येथे उपस्थित राहणार आहेत. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानतळावर मोदी यांच्या स्वागताला जाणार आहेत. दरम्यान, ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची आणि मोदी यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आढाव्यासह इतर विषयांवरील चर्चेसाठी दि.8 डिसेंबरपर्यंत ही परिषद होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह 180 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख वाय. के. जेठवा यांनी बुधवारी शहरात येऊन सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्यानंतर स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपकडून (एसपीजी) सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमस्थळ, प्रवास मार्गासह वास्तव्याच्या ठिकाणांची तपासणी केली. गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार यांनीही परिषद ठिकाणाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल, पुणे पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.