पाटणा – एका कार्यक्रमादरम्यान भाजपच्या कोरोना बाधित नेत्याच्या संपर्कात आल्याने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप नेते अवधेश नारायण सिंह यांनी शुक्रवारी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. आज या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून सिंह यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अवधेश नारायण सिंह हे १ जुलै रोजी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात आले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. १ जुलै रोजीच्या या कार्यक्रमाचे व्हिडीओ फुटेज देखील समोर आले असून यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजप नेते अवधेश नारायण सिंह शेजारी बसले असल्याचे दिसत आहे.
या कर्यक्रमास उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, बिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी, मंत्री श्रावण कुमार, मंगल पांडे आणि विनोद नारायण झा, बिहार विधानपरिषदेतील भाजपाच्या प्रतोद रीना यादव, आमदार अब्दुल बारी सिद्दीकी आणि भोला यादव हे नेते उपस्थित होते. मंचावर विराजमान सर्व नेत्यांनी आपल्या तोंड व नाकाभोवती गमछा गुंडाळल्याचे उपलब्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच त्यांच्या सचिवांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.