हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तेलंगण दौऱ्यासाठी येथील विमानतळावर दाखल झाले. मात्र, त्यांच्या स्वागतावेळी केसीआर नावाने ओळखले जाणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची अनुपस्थिती वादंगाचा विषय ठरली.
विमानतळावर मोदींचे स्वागत राज्यपाल तामीळीसाई सुंदरराजन, केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी आणि तेलंगणचे मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांनी केले. मोदींच्या स्वागतासाठी केसीआर विमानतळावर उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली.
शिष्टाचाराचे पालन न करून केसीआर यांनी केवळ मोदींचाच नव्हे; तर संपूर्ण देशाचा अपमान केला असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार यांनी म्हटले. अलिकडेच केसीआर यांनी मोदींवर अनुचित टीका केली. त्यामुळे मोदींसमोर जाण्यास केसीआर घाबरत आहेत, असा शाब्दिक टोमणाही त्यांनी मारला.
दरम्यान, प्रकृती ठीक नसल्याने केसीआर मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. ती जबाबदारी मंत्री यादव यांच्या सोपवण्यात आली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले. मात्र, संबंधित घडामोडीवरून तेलंगणमधील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.