आमदारकीच्या पहिल्याच ‘टर्म’मध्ये मुख्यमंत्री! जाणून घ्या ‘रेस’मध्ये नसतानाही मुख्यमंत्री झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्याबाबत…

अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं म्हंटल जात होत. मात्र आज झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भूपेंद्र पटेल हे गुजरातेतील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार म्हणून पटेल यांची ही पहिलीच टर्म आहे. विशेष म्हणजे रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती त्यामध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा समावेश देखील नव्हता. अशातच आता त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याने पटेल ‘रेस’मध्ये नसतानाही कसे जिंकले याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज (शनिवारी) झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री रुपाणी यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. भाजपच्या सर्व आमदारांनी पटेल यांच्या नावाला सहमती दर्शवली.

पेशाने इंजिनिअर असलेले पटेल यांनी यापूर्वी, अहमदाबाद म्युनिसिपल कर्पोरेशन, अहमदाबाद अर्बन डिवेलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. २०१७ मध्ये त्यांनी आनंदीबेन पटेल यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या घाटलोडिया येथून प्रथम विधानसभा निवडणूक लढवत जिंकली. विधानसभा सदस्य म्हणून पहिल्याच ‘टर्म’मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.