तीन दिवसांचे मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस लिहितायेत पुस्तक

मुंबई – महाराष्ट्रात एका वर्षापूर्वी राजकीय भूकंप झाला होता. सकाळी जेव्हा लोक झोपेतून जागे झाले तेव्हा जनतेने पाहिले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (ज्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार होता) यांनी भूमिका बदलून सगळ्यांना आश्‍चर्यचकित केले होते. त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले.

मात्र महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानावर लिहिलेल्या या घटनाक्रमाबाबत आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुस्तक लिहीत आहेत. आज त्यांनी याबाबत खुलासा केला.

फडणवीस यांनी याबाबत म्हटले की, एका वर्षापूर्वी 23 नोव्हेंबरला राजभवनात मुख्यमंत्रिपदाच्या शपथग्रहण समारोहावर एक पुस्तक लिहीत आहे. त्यांना या घटनेला विसरायचे नाही.

पुढे ते म्हणाले, अशा घटनांना लक्षात ठेवायचे नाही. मात्र तरीही ते म्हणाले की, आता भविष्यात महाराष्ट्राची जनता योग्य वेळी नव्या सरकारचा शपथग्रहण विधी पाहणार.

23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती.

या घटनेबद्दल महाराष्ट्रात तसेच भारतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपा या विजयाचा जल्लोष साजरा करीत होती तर राष्ट्रवादी अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचा हा इरादा हाणून पाडला. अजित पवार यांनी आपला पाठिंबा काढून घेतल्याने भाजपा अल्पसंख्येत आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अवघ्या तीन दिवसांचे मुख्यमंत्री असाही एक रेकॉर्ड फडणवीसांच्या नावे जमा झाला. या तीन दिवसांच्या घटनेवरच पुस्तक लिहीत असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी आज दिली.

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन विरोधी विचारधारेच्या पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडली तर अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. तेव्हा सरकार कुणाचे का असेना उपमुख्यमंत्री अजित पवारच अशी काळ्या दगडावर रेघ उमटली.

या महाविकास घाडीचे शिल्पकार ठरले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, तर सरसेनापतीची भूमिका निभावली शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी.

महाराष्ट्र विधानसभा 2019ची निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने एकत्र लढविली होती. या निवडणुकीत भाजपाला 105 जागा तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादीला 54 जागा तर कॉंग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला.

भाजपा-शिवसेना सहज सरकार बनवणार असे स्पष्ट चित्र असताना ‘मुख्यमंत्री कुणाचा?’, यावर घोडे अडले आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा इतिहास जन्माला आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.