पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत देशविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचा कितीही निषेध केला तरी तो पुरेसा नाही. पोलीस त्यांची कारवाई करतीलच; पण शिवाजी महाराजांच्या भूमीत हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
दरम्यान, या प्रकारात जे कोणी सामील असतील त्यांची गय केली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले आहे. नागपूर येथे बोलताना ते म्हणाले की, कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा महाराष्ट्रात आणि देशात करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. ते जिथे कुठे असतील त्यांना आम्ही शोधून काढू आणि त्यांच्या विरोधात कारवाई करू.