राहुरी – येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात दि. 25 ते 27 मे दरम्यान 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत चारही कृषि विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांना, संशोधन तंत्रज्ञानाच्या शिफारशींना तसेच सुधारीत औजारांना चर्चेअंती मान्यता देण्यात येईल. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 5 वाण, फळ पिकाचे 1 वाण, 3 यंत्रे व 74 शिफारशी, दापोली कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 2 वाण, फळ पिकाचे 1 वाण व 38 शिफारशी, परभणी कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 4 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 46 शिफारशी, अकोला कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 3 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 75 शिफारशी यांचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. किशोर दराडे, आमदार राम शिंदे, आ. सत्यजीत तांबे, आ.प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे स्वागताध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत.