सातारा -विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि. 27) दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर महाबळेश्वर येथे येत आहेत. महाबळेश्वरपासून पाच किलोमीटरवर हॉटेल ब्राईटलॅंड येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. हा दौरा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा असून या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी कुठलाही शासकीय कार्यक्रम घेतलेला नाही.
पोलीस प्रशासनाने या दौऱ्याची अधिकृतरित्या पुष्टी केलेली नाही. परंतु, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी पाच अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त हॉटेल परिसरात तैनात केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांतील हा दुसरा दौरा आहे. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या मूळ गाव असणाऱ्या दरे तांब येथे भेट दिली होती. तेव्हाही त्यांनी महाबळेश्वरमध्ये पाहुणचार स्वीकारला होता. मुख्यमंत्री विश्रांतीसाठी महाबळेश्वरला येत आहेत. हा दौरा पूर्णपणे खासगी असल्याने कोणालाही तेथे प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.