मुंबई : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये नाराजीनाट्य असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला अशी चर्चा सुरु आहे.
सर्व काही सुरळीत सुरु नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही, त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वाय प्लस सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. तर काही आमदारांची सुरक्षाच काढून घेण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षा कमी करण्याचा निर्णय आजपासूनच (17 फेब्रुवारी) लागू करण्यात आला आहे.
शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकनाथ शिंदेंचे मंत्री आणि आमदार नाराज
वाय दर्जा सुरक्षा श्रेणीमध्ये 11 जवानांचे पथक सुरक्षेसाठी तैनात असते. यात दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारी यांचा समावेश असतो. मंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यामुळे मंत्री आणि आमदार नाराज आहेत. याबद्दलची नाराजी संबंधीतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
सुरक्षेचे ‘हे’ आहेत तीन स्तर
- झेड प्लस – 55 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह दहा पेक्षा जास्त एनएसजी कमांडोंचा समावेश.
- झेड दर्जा – 22 कर्मचाऱ्यांचे सुरक्षा पथक असते. चार ते पाच एनएसजी कमांडो आणि एक पोलिस अधिकारी सुरक्षेत तैनात असतो.
- वाय दर्जा – 11 जवानांचे सुरक्षा कडे असते. यात दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो.
- एक्स श्रेणी सुरक्षा – दोन ते पाच सुरक्षा कर्मचारी. यात एक सशस्त्र अधिकारी देखील असतो.