मुख्यमंत्रीपदाचा “क्‍लिक’

छायाचित्रकार ते मुख्यमंत्रीपद उध्दव ठाकरे यांचा रंजक प्रवास

मिथिलेश जोशी

एक उत्कृष्ठ छायाचित्रकार ते भावी मुख्यमंत्री असा उध्दव ठाकरे यांचा मोठा प्रवास रंजक आणि खडतर आहे. खरे तर बाळासाहेबांनंतर शिवसेना संपेल, अशी भाजपाच्या चाणक्‍यांची बाळासाहेब असल्यापासूनची अटकळ होती. ती अटकळ फोल ठरवत मुख्यमंत्री पदाला शिवसेनेने गवसणी घातली आहे. या प्रवासात सामनाचे संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांना मोलाची साथ मिळाली.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाच्या करिष्म्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे होते. कारण वारसा मिळाला असला तरी तसा करिष्मा उध्दव यांना नव्हता. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची नेहमीच बाळासाहेबांशी तुलना होत राहिली. विरोधकांनी या मुद्यावरून त्यांचे खच्चीकरण करण्याचे करण्याचे अनेकदा प्रयत्न केले.

उध्दवजी हे त्यांच्या सौम्य प्रकृतीचे आणि वृत्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अंगावर घेत त्यांनी मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे या उक्तीची प्रचिती दिली. ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी दिलेल्या सहमतीला होकार कळवला तर ते पदावर बसणारे पहिलेच ठाकरे असतील. कारण आजपर्यंत रिमोट कंट्रोल बाळगत सत्तेवर अंकुश ठेवणेच ठाकरे यांनी पसंत केले.

शिवसेना पक्षप्रमुख त्यांनी नेहमीच संतुलीत आणि अत्याधुनिक आणि व्यावसायिक पध्दतीने काम पाहिले. ते टॅब बाळगत त्यात अनेक गोष्टींच्या नोंदी ठेवतात.बाळासाहेब आणि मिनाताई यांच्या पोटी बिंदुमाधव आणि जयदेव यांच्यापाठोपाठ आलेले हे तिसरे अपत्य. राज ठाकरे यांच्या आई कुंदा या त्यांच्या सख्ख्या मावशी आणि काकूही. त्या त्यांना श्रावणबाळ म्हणायच्या. कारण ठाकरे यांच्या नव्या पिढतील ते  सर्वात आज्ञाधारक आणि शांत स्वभावाचे होते.

उध्दव हेही राज यांच्या प्रमाणेच जेजे स्कूल ऑफ आर्टस्‌चे पदवीधारक. 1995 ते 99 या काळात त्यांनी राज यांच्यासह शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावत राजकारणात चंचुप्रवेश केला. 2003 मध्ये महाबळेश्‍वर अधिवेशनात त्यांची कार्यकारी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. ही घोषणा खुद्द राज ठाकरे यांनीच केली होती. त्यावेळी बाळासाहेब 76 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यभार सांभाळण्यास सुरवात केली. त्यांची शिवसेनेत पहिली चकमक उडाली ती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी. त्यामुळे शिवसेना प्रमुखांनी राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांच्या आणि राज यांच्या संबंधात वितुष्ट येत गेले. त्यातून राज यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर एकमुखी वर्चस्व निर्माण केले.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने युती तोडल्याची घोषणा केली. निवडणुकीनंतर युती करून भाजपसोबत शिवसेना सत्तेत तर सहभागी झाली. मात्र, तरीही मोदी आणि शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. या काळात त्यांचे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे संबंध सौहार्दाचेच होते. मात्र मुख्यमंत्रीपदाचा प्रश्‍न निर्माण झाला आणि त्यांनी तीन दशकांपासून सुरू असणाऱ्या युतीवर दोन्ही पक्षांनी फुली मारली.

त्यांची महाराष्ट्र देशा (2010) आणि पहावा विठ्ठल (2011) ही हवाई छायाचित्रांवर आधारीत पुस्तके प्रकाशित केली. 2019च्या दसऱ्या मेळाव्यात शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन असे वचन दिले ते अशा पध्दतीने त्यांनी पूर्ण केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)