चंदीगड – पंजाबमध्ये नुकतेच नेतृत्वबदल करण्यात आले असून राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ काँग्रेसने चरंजीतसिंग चन्नी यांच्या गळ्यात टाकली आहे. मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून चन्नी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आज आम आदमी पक्षाचे पंजाबमधील नेते राघव चढ्ढा यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्या मतदारसंघात सुरु वाळू चोरीचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करत गंभीर आरोप लगावले आहेत.
चढ्ढा यांनी आज मुख्यमंत्री चन्नी यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिंदापूर गावातील नदीकिनारी जात एक लाईव्ह व्हिडीओ केला. या व्हिडिओमध्ये जेसीबीच्या आधारे नदीतून वाळू उपसा सुरु असल्याचे व ट्रकद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री चन्नी हेच वाळूमाफिया असल्याचा गंभीर आरोप केला.
“मुख्यमंत्री चरंजीतसिंग चन्नी यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या वाळू चोरीचा आज पर्दाफाश झाला आहे. यामुळे पंजाबचे राजकारण हादरनार आहे.” असं चढ्ढा म्हणाले.
यावेळी चढ्ढा यांनी, ‘मुख्यमंत्री झाल्यानंतर चन्नी यांनी स्वतःच वाळूमाफियांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही करू नये असं म्हंटल होत. मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात त्यांचाच राजकीय वरदहस्त लाभल्याने वाळू चोरी सुरु आहे.’ असा आरोप केला.
आपचे युवा नेते राघव चढ्ढा यांनी वाळूचोरीचा पर्दाफाश केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘आजपर्यंत मला अनेकांनी चन्नी हे सर्वात मोठे वाळूमाफिया आहेत असं सांगितलं मात्र मी विश्वास ठेवला नाही. परंतु आज माझा यावर विश्वास बसला की तेच प्रदेशातील सर्वात मोठे वाळूमाफिया आहेत.’ असं ट्विट केलं.
पुढील वर्षी निवडणुका
पंजाबमध्येपुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने निवडणुकांपूर्वीच खांदेपालट केल्याने नाराज अमरिंदरसिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत आपला स्वतंत्र पक्ष काढून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाने देखील पंजाबमध्ये विशेष लक्ष घातले असून निवडणूकपूर्व चाचण्यांतून आम आदमी पक्ष पंजाबमध्ये चांगली मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
CM @charanjitchanni जगह जगह घूमकर भांगड़ा डाल रहे हैं और यहां उनकी खुद की विधानसभा में माफिया करोड़ों रुपए की रेत खनन कर रहा है.
चन्नी साहब तो कहते थे मैं रेत माफिया का CM नहीं हूं पर यहां तो लगता है CM ही रेत माफिया है.
दूध की रखवाली बिल्ली के हवाले! pic.twitter.com/HEQIJ1XOFZ
— Raghav Chadha (@raghav_chadha) December 4, 2021