गरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश

जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयात जाणे अवघड बनल्याच्या दाव्यांची गंभीर दखल

नवी दिल्ली  -जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयात दाद मागणे जनतेला अवघड जात असल्याबाबतचे दावे अतिशय गंभीर असल्याच्या शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. एवढेच नव्हे तर, गरज भासल्यास स्वत: श्रीनगरला भेट देईन, अशी टिप्पणी थेट सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केली.

जम्मू-काश्‍मीरशी संबंधित एका सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाणे अवघड बनल्याच्या दाव्यांना गांभीर्याने घेतले. त्या दाव्यांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलण्याची ग्वाही गोगोई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने त्या दाव्यांसंदर्भात उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या दाव्यांची खातरजमा आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे.

मात्र, ते दावे खोटे आढळल्यास याचिकाकर्त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला. जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आल्यानंतर तिथे निर्बंध लागू करण्यात आले.

त्यानंतर तिथे अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप एका जनहित याचिकेतूून करण्यात आला आहे. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जाणे अवघड बनल्यासंबंधीचे दावे केले.

Leave A Reply

Your email address will not be published.