नवी दिल्ली – सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश एन.व्ही. रामणा यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे बोबडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रामणा यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची धुरा जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले.
सरन्यायाधीश बोबडे पुढील महिन्यात (23 एप्रिल) निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशातून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने बोबडे यांना उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्याची विनंती नुकतीच केली. त्यानंतर बोबडे यांनी सेवाज्येष्ठतेची प्रथा कायम ठेवत रामणा यांच्या नावाची शिफारस केली. संबंधित लेखी शिफारसीचे पत्र मंत्रालयाकडे सादर करण्यात आले. केंद्र सरकारने त्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केल्यास नवे सरन्यायाधीश म्हणून रामणा 24 एप्रिलला सुत्रे स्वीकारतील. ते 26 ऑगस्ट 2022 ला सेवानिवृत्त होतील. आंध्रप्रदेशमध्ये जन्मलेल्या रामणा यांनी 1983 मध्ये वकिलीचा श्रीगणेशा केला. आंध्र उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून 2000 या वर्षी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2013 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. पुढच्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली.