महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा घेणार आढावा
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उद्या (मंगळवार) दोन दिवसीय भेटीसाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्या भेटीत ते महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.
पुढील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. त्याआधी अरोरा मुंबई भेटीवर येत आहेत. त्यांच्यासमवेत अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हे केंद्रीय निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तही असतील. आयोगाचे ते पथक निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेईल. त्याशिवाय, आयोगाचे पथक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करेल.
महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला समाप्त होत आहे. त्याआधी नवी विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची घोषणा होण्याची प्रतीक्षा आता राज्याला आहे.