पुणे – बालकांच्या मोफत व सक्तींच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत राखीव जागावर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतीपुर्ती राज्य शासनाकडून शाळांना अदा केली जाते. शिक्षणापोटी शासनाकडून आलेली शुल्क प्रतीपुर्तीची रक्कम शाळेला देण्यासाठी १२ हजार ६०० रुपये लाच मागणाऱ्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातील मुख्य लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या लाचखाऊच्या प्रकरणामुळे शिक्षण विभागाला पुन्हा कलंक लागला आहे.
सुनिता रामकृष्ण माने (वय ४६) असे एसीबी रंगेहाथ पकडलेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि.१६) सेंट्र्ल बिल्डिंग येथील प्राथमिक शिक्षण संचनालनालय येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यांच्या नाशिक जिल्ह्यात कायम विनाअनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. त्या शाळांमधून इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते.
तक्रारदाराच्या दोन्ही शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार १२ लाख ६९ हजार १४१ रुपये शुल्क प्रतीपुर्तीची रक्कम शासनाकडून येणे बाकी होते. उच्च न्यायालयाने आठ आठवड्याच्या आत मध्ये ही रक्कम संबंधित संस्था चालकास (तक्रारदारास) अदा करणे बाबत ऑगस्ट २०२४ मध्ये आदेश दिला होता. त्याप्रमाणे शासनाने सप्टेंबर २०२४ रक्कमही रिलीज केली होती.
ही रक्कम तक्रारदार यांना अदा करण्यासाठीचे आदेश नाशिकच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्याकरता यातील माने यांनी तक्रारदार यांना मिळणाऱ्या एकूण १ टक्के म्हणजे १२ हजार ६०० लाचेची मागणी करून ती रक्कम प्राथमिक शिक्षण संचालनालय येथे तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करत आहेत.