नवी दिल्ली – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना “आयएनएक्स’ मिडीयाच्या “मनी लॉन्डरिंग’ प्रकरणी सुनावण्यात आलेली न्यायालयीन कोठडीची मुदत 11 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचलनालयाकडून करण्यात येत आहे.
तपास अद्याप सुरू असल्याने चिदंबरम यांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात यावी, अशी मागणी “ईडी’च्यावतीने करण्यात आली होती. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी या संदर्भातील आदेश आज दिले. या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ देण्याला चिदंबरम यांच्यावतीने विरोध केला गेला नाही.
चिदंबरम यांना 16 ऑक्टोबर रोजे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. 15 नोव्हेंबर रोजी चिदंबरम यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशांना आव्हान देण्यासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे.