नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी चिंदंबरम यांची एअर इंडिया विमान खरेदी प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) पुन्हा चौकशी सुरू केली. आयएनएक्स मिडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तिहारच्या बाहेर आलेल्या चिदंबरम यांना या प्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागले.
चिदंबरम यांची शुक्रवारी सहा तास चौकशी सुरू होती. तत्पुर्वी ईडीने चिदंबरम यांना 23 ऑगस्ट 2019 रोजी चौकशीला सामोरे जाण्यासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र सीबीआयने त्यांना 20 ऑगस्ट रोजी आयएनएक्स मिडिया प्रकरणात अटक केली.
विमानांच्या खरेदीची फाईल चिदंबरम यांच्या मार्फत मंजुरीसाठी गेली होती. त्यामुळे त्यांची चौकशी आवश्यक होती, असे सूत्रांनी सांगितले. एअर इंडियासाठी 43 विमाने खरेदी करण्याच्या कंत्राटाला 2009मध्ये चिदंबरम यांच्या नेतृतवखालील समितीने मंजूरी दिली होती. यावेळी मंत्रीमंडळाच्या सुरक्षा समितीकडे गेलेल्या प्रस्तावात प्रशिक्षण केंद्राची उभारणी देखभाल, दुरूस्ती आणि संपूर्ण दुरूस्ती अशा कलमाचा समावेश होता. त्यातून 17 कोटी 50 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा करार केला. मात्र नंतर खरेदी आदेश देताना त्यातून हे कलम वगळले गेले.
काही महनीय व्यक्तींविरोधात परिस्थितीजन्य पुरावे असल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले. हा करार झाला त्यावेळी म्हणजे 2004 ते 2011 या काळात प्रफुल्ल पटेल हे हवाई वाहतूक मंत्री होते. त्यामुळे या प्रकरणात दीपक तलवार यांच्या विरोधात 30 मार्च रोजी आरोपत्र दाखल केले. त्यात पटेल यांच्या नावाचा समावेश होता. तलवार या प्रकरणात मध्यस्थ होता अणि तो पटेल यांच्या नियमीतपणे संपर्कात होता, असेही या सूत्रांनी सांगितले.