चिदंबरम यांची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली- माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयापुढे उपस्थित राहण्याची याचिका दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातील मुक्‍काम 19 सप्टेंबरपर्यंत वाढला आहे.

आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या ते तिहार तुरुंगातच आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर ते 15 दिवस सीबीआयच्या कोठडीत होते. आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्या वकिलांकडून जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडून सद्यस्थिती अहवाल मागवून घेतला आहे. सात दिवसांत हा अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगण्यात आले आहे.

दरम्यान, चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान देणारी याचिका त्यांच्या वकिलांकडून मागे घेण्यात आली. त्याचवेळी जामिनासाठी याचिका दाखल करण्यात एवढा उशीर का केला, असाही प्रश्न न्यायालयाने चिदंबरम यांच्या वकिलांना विचारला. गेल्या गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मग आज न्यायालयात जामिनासाठी याचिका का दाखल करण्यात आली, असे न्यायालयाने विचारले.

Leave A Reply

Your email address will not be published.