पुणे – बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सावधगिरीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाजी मार्केट येथील चिकन विक्रेते दुकानदारांना मालाची स्वच्छता, परिसर टापटीप ठेवण्यासह आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजी संबंधिच्या सूचना दिल्या.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य विभाग प्रमुख आर. टी. शेख यांनी शिवाजी मार्केट परिसराला भेट देऊन तेथील दुकानदारांशी संवाद साधला. मार्केटमध्ये 19 चिकन विक्रेत्यांची दुकाने आहेत. अगोदरच करोनामुळे अनेकजण आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यातच बर्ड फ्लूच्या धास्तीने चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे.
नागरिकांकडूनही चिकनची फारशी खरेदी होत नाही. त्यातच स्लॉटर हाऊसचीही स्वच्छता महत्त्वाची आहे. यापार्श्वभूमीवर बोर्ड प्रशासनाने आवश्यक ती काळजी, सावधगिरी बाळण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, शिवाजी मार्केटच्या बाहेर चिकनच्या गाड्या उभ्या करू नयेत.
संपूर्ण मार्केट परिसर स्वच्छ ठेवावा. दुकानात काम करणाऱ्या कामगारांनीही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अशा सूचना केल्या. याबाबत केंद्राकडून अद्याप कोणतेही थेट आदेश आले नसल्याचेही शेख यांनी सांगितले.