चिचोंडी पाटीलची छावणी ठरली दुष्काळात आधार

छावणीतील शेतकरी समाधानी; शेतकऱ्यांकडून छावणीचालकाच्या सत्काराचे आयोजन
शेतकऱ्यांकडून छावणीचालकाचा सत्कार होण्याची पहिलीच घटना

नगर – अनेक दुष्काळ पाहिले, छावण्याही पाहिल्या, यंदा मात्र आम्हाला चारा छावणी न वाटता आमच घरच वाटते. आम्ही आमच्या घरी जनावरांसाठी जो चारा देऊ शकत नव्हतो, तो आम्हाला छावणी चालकांकडून मिळत आहे. ऊस, वाढे व हिरवीगार मकाचा चारा मिळत असल्याने कोणतीही अडचण येत नाही. छावणीमुळे आमची जनावरे सुधारत आहेत. दुधाच्या प्रमाणातही तूट झालेली नाही. आमच्या जनावरांना चाऱ्याबरोबरच मुबलक व स्वच्छ पाणी मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली.

चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे नगर तालुका खरेदी विक्री संघ संचलित चारा छावणी सुरू आहे. या छावणीमध्ये एकूण 1089 जणावरे आहेत. यामध्ये लहान 179 तर मोठे 910 जणावरे आहेत. यामध्ये बैल, गायी व म्हशीचे प्रमाण अधिक आहेत. मोठ्या जणावरांना रोज 15 किलो ओला चारा तर लहान जनावरांना साडेसात किलो चाऱ्याचे वाटप दररोज केले जाते. ओल्या चाऱ्यामध्ये ऊस, वाढे व मका याची कुटी करून चाऱ्याचे वाटप दररोज केले जाते. 10 मार्चपासून छावणी सुरू केलेली असून आजपर्यंत चाऱ्याची कोणतीही अडचण आलेली नसल्याचे शेतकऱ्यांनी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केली.

मोठ्या जनावरांसाठी रोज अर्धाकिलो खुराकाचे वाटप दोन दिवसाआड केले जात आहे. तर लहान जनावरांसाठी 250 ग्रॅम खुराकाचे वाटप केले जात आहे. जनावरांसाठी हिरवा चारा श्रीगोंदा, शिरूर व नगरमधून उपलब्ध करून छावणीमध्ये आणला जातो, चारा छावणीसाठी प्रशासनाकडून आठ दिवसांतून एकदा चेकिंग केली जाते. नवीन जनावरे आली तरी, आम्ही परवानगीची वाट न पाहता त्यांना परत न पाठविता त्यांनाही चारा दिला जातो. छावणीत सी.सी.टी.व्ही बसविण्यात आले आहेत. अग्णीशमन यंत्रणेबरोबर रात्री प्रकाशासाठी एलइडी बसविले आहेत. जनावरांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. पाण्याची उत्तम व मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.

छावणीत स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. पहाटे 4 ते 8 वाजेपर्यंत चाऱ्याची कुट्‌टी केली जाते. सकाळी आठपासून प्रत्येक शेतकऱ्यांना चाऱ्याचे वाटप केले जाते. छावणीत शिस्त आहे. समान न्याय ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. आम्ही शेतकऱ्याला बरोबर घेत दुष्काळाचा सामना करीत आहोत. प्रशासनाने लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे अडचण येणार नाही.

बाजीराव हजारे, छावणीचालक

माझी सहा जनावरे आहेत. कोणतीही अडचण नाही. दिवसभर छावणीमध्ये असतो. जनावरांना योग्य प्रमाणात चारा स्वच्छ व मुबलक पाणी मिळत असल्याने जनावरांमध्ये सुधारणा होत आहे. छावणी नसती तर, घरी ओला चारा मिळालाच नसता.

भाऊ खेडकर, शेतकरी

छावणी चालकांनी छावणी उत्तम चालविली आहे. त्यामुळे 5 मे ला छावणी चालकांचा सत्कार भोजन व कीर्तनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच ह.भ.प. सोनालीताई करपे यांचे सायंकाळी 6 वाजता प्रवचन छावणीजवळ ठेवण्यात आले आहे.

सुरेश तनपुरे, शेतकरी

छावणीमध्ये नियमानुसार चारा, खुराक व पाणी भरपूर मिळत आहे. छावणी सुरू झाल्यापासून एकही दिवस चाऱ्याची अडचण आलेली नाही.

रावसाहेब कोकाटे, शेतकरी

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.