लकडावालाने चौकशीत दिली माहिती
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला 1998 मध्ये पाकिस्तानच्या कराचीत उडवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. दाऊदचा प्रतिस्पर्धी असणारा आणखी एक डॉन छोटा राजन काही भारतीय यंत्रणांच्या मदतीने तो प्लॅन तडीस नेणार होता. मात्र, त्याचा सुगावा लागल्याने दाऊद बचावला.
एकेकाळी दाऊदचा निकटचा साथीदार असणारा गॅंगस्टर एजाज लकडावाला याने मुंबई पोलिसांना चौकशीवेळी संबंधित माहिती दिली. सुमारे दोन दशके पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 50 वर्षीय लकडावाला याला मागील महिन्यात अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून महत्वाची माहिती हाती लागली आहे. काही वर्षांपूर्वी दाऊदशी बिनसल्याने लकडावाला छोटा राजनसमवेत काम करू लागला. त्यानंतर छोटा राजन याने लकडावाला याच्यासह काही साथीदारांना 1998 मध्ये दाऊदचा खात्मा करण्यासाठी कराचीला पाठवले.
दाऊद एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर छोटा राजनचे साथीदार तिथे पोहचले. मात्र, आपल्यावरील हल्ल्याच्या प्लॅनची माहिती दाऊदला मिळाल्याने तो मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत तिथे पोहचला. त्यामुळे छोटा राजनच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला करण्याचे टाळले. ते साथीदार कराचीत राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहचले. त्यावेळी छोटा राजनने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने तिथून निघून जाण्यास सांगितले. दाऊदला हल्ल्याच्या प्लॅनचा सुगावा लागला असल्याचे छोटा राजनने सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानी पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकून शस्त्रास्त्रे जप्त केली.
नेपाळमधील एका खासदाराने छोटा राजनच्या प्लॅनची माहिती दाऊदला दिली. नंतर त्या खासदाराची हत्या छोटा राजनच्या साथीदारांनी केली. दाऊदला ठार करण्याचा प्लॅन फसल्यावर त्याचा निकटचा साथीदार छोटा शकिल याने छोटा राजन आणि लकडावाला यांच्यावर स्वतंत्रपणे हल्ले केले. मात्र, ते दोघेही बचावले. छोटा राजनवर 2000 मध्ये तर लकडावाला याच्यावर 2002 यावर्षी बॅंकॉकमध्ये हल्ला झाला. नंतरच्या काळात लकडावाला आणि छोटा राजनमध्येही मतभेद निर्माण झाले. त्यातून लकडावाला 2008 पासून स्वतंत्रपणे काम करू लागला. त्याला मागील महिन्यात बिहारच्या पाटणा विमानतळावर पकडण्यात आले.