पुणे – पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकांकडे 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा वर्षे फरार असलेल्य कुख्यात छोटा राजन टोळीतील हस्तकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. कोंढवा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या हस्तकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबईतील पथकाकडे सोपवले आहे.
परमानंद हंसराज ठक्कर (56, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकांची पुण्यातील मार्केटयार्ड भागात जमीन आहे. या जमिनीच्या मालकीबाबतची कोणतीही कागदपत्रे नसताना ठक्कर यांनी जमीन स्वत:च्या मालकीची आहे, अशी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही कागदपत्रे घेऊन ठक्कर मुंबईतील कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्याकडे गेला आणि याप्रकरणात मदत करण्यास सांगितले.
नाईकने त्याला नकार दिला. त्यानंतर ठक्करने राजन टोळीतील गुंड सुरेश शिंदे (रा. चेंबुर, मुंबई) याच्याशी संपर्क साधला. शिंदेने छोटा राजनशी संपर्क साधला. शिंदेने तेथून बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. “26 कोटी रुपये खंडणी दिल्यास प्रकरण मिटवून टाकतो, अन्यथा परिणाम वाईट होतील’ अशी धमकी दिली.
बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी छोटा राजनसह सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून ठक्कर पसार झाला होता. ठक्कर कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी सीबीआयच्या पथकाला याबाबतची माहिती दिली.
ठक्करला कोंढवा भागातून अटक करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी ही कारवाई केली.