नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशफ
नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर महापालिकेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी विशेष सभा घेऊन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाला मंजुरीसाठी 9 मार्च 2018 रोजी सादर केला होता. हा अहवाल आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 13 (1) (अ) मधील तरतुदींनुसार छिंदम यांना नोटिस बजावण्यात येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. तसेच, तत्कालीन राज्यमंत्री, नगरविकास यांच्याकडे 17 ऑक्टोबर 2018, तसेच 5 ऑगस्ट 2019 आणि 22 ऑगस्ट 2019 रोजी सुनावण्या झाल्या. परंतु, त्यावर काहीही निर्णय झाला नाही.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहाण्यास नकार दर्शवत छिंदम यांनी यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंब केलेल्या प्रक्रियेचा विचार करून छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले.
काय म्हणाला होता छिंदम
सन 2018 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फोनवरील संभाषणादरम्यान नगर महानगरपालिकेचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छींदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये छिंदमने ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले होते.
या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होवून श्रीपाद छींदमवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलने झाली होती. ठिकठिकाणी निषेध करण्यात येवून भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर भाजपाने त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर पुन्हा डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून श्रीपाद छिंदम अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला होता.