सुकमा – छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. या जिल्ह्यातील मिनापा गावातील जंगल परिसरात ही चकमक झाली. सुरक्षा पथकांनी तेथे संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती, त्यावेळी ही चकमक झाली असे सांगण्यात येते.
जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफ यांनी ही संयुक्त मोहीम हाती घेतली. त्यावेळी सुमारे दीड तास ही चकमक झाली. त्यात एक नक्षलवादी ठार झाला तर बाकीचे अनेक जण पळून गेले. पळून गेलेल्यांपैकी अनेक नक्षलवादी जखमी झाले असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तेथील शोध मोहीम अजूनही सुरूच ठेवण्यात आली आहे. काही जखमी नक्षलवादी सुरक्षा जवानांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.