छत्रपती कारखान्यातील कामगार भरतीवरून “रणकंदन’

जाचक म्हणतात राजकीय फायद्यासाठी निर्णय; तर अध्यक्ष काटे म्हणतात कामगार भरती केली नाही
भवानीनगर (वार्ताहर) – बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीत “रण’ पेटले आहे. तर बारामतीच्या हद्दी लगत असलेल्या इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर कारखान्याच्या निवडणूक लवकरच लागणार असली तरी त्याआधीपासूनच कारखाना गाळात रुतला असून कारखान्यातील विविध मुद्‌द्‌यांवरून सध्या छत्रपती कारखा कार्यक्षेत्रात “रणकंदन’ पेटले आहे. तर “छत्रपती’तील हेच विरोधी मुद्दे “माळेगाव’च्या रणात कळीचे ठरले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोक्‍याला “ताप’ झाले आहेत.

सर्व नियम, कायदे बसवले धाब्यावर- जाचक
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा अजब कारभार सुरू आहे. मंडळाकडून सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून कामकाज करीत आहे, असा आरोप छत्रपतीचे माजी अध्यक्ष आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कारखाना कामगारांना पगार तसेच दिवाळी व संक्रातीचा बोनस देऊ शकला नाही. तरीसुद्धा जाता-जाता आपल्या मर्जीतील व राजकीय फायद्यासाठी संचालक मंडळाने कामगार भरती सुरू केली आहे. या महिन्यात संचालक मंडळाने काही कामगार कायमस्वरूपी कामावरती घेतलेले आहेत.

कारखान्याचे एक युनिट बंद असताना व कारखाना अडचणीत असताना अशी भरती करणे बेजबाबदारपणाचे आहे. आमच्या माहितीनुसार अजून एकवीस कामगारांची लवकरच भरती होणार आहे. साखर आयुक्‍तांनी स्टाफींग पॅटर्न (आकृतीबंध) निश्‍चित झाल्याशिवाय व त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कामगार भरती करू नये, असे आदेश असताना कामगार भरती सुरू केली आहे.

भरती केलेल्या कामगारांची नावे संचालक मंडळ सांगण्यास नाकारत असेल तर ती नावे आम्ही सांगण्यास तयार आहोत. एफआरपी देता येत नाही, गतवर्षीच्या एफआरपीचे व्याज देता येत नाही. कामगारांचे पगार व बोनस देता येत नाही. तोडणी कामगारांना ऍडव्हान्स नसल्याने एक युनिट बंद आहे. सर्व गंभीर बाबी असताना संचालक मंडळाचा नोकर भरतीचा अट्टाहास असेल तर त्या संबंधित भरती केलेल्या कामगारांच्या पगाराचे पैसे संचालक मंडळाच्या ऊस बिलातून वसूल करावेत. याबद्दल तक्रार साखर आयुक्‍तांकडे केली आहे. यावेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब रायते, शिवाजीराव काटे, सतीश काटे, विशाल निंबाळकर व कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुदतीपूर्वीच कामगारांचा पगार जमा- काटे
श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कामगार संघटनेतील समन्वयाने ठरलेल्या निर्णयानुसार कामगारांचा पगार मुदतीपूर्वीच सोमवारी (दि. 17) जमा करण्यात आला आहे. एफआरपीची प्रक्रिया नियमित सुरू आहे. कामगार भरती केलेली नाही, उगीचच कारखान्याची बदनामी करत फिरायचे आणि संस्थेविषयी कळवळा दाखवायचा असले प्रकार सध्या सुरू आहेत. एखादे घर अडचणीत असते, तेव्हा कारभाऱ्याला साथ देणारे सगळे “भाऊ’ असतात. छत्रपती म्हणजे सभासदांच्या प्रपंचाची चूल असे म्हणणारे प्रत्यक्षात फक्‍त राजकारण करीत आहेत, असे प्रतिउत्तर श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिले.

कारखान्याची परिस्थिती चांगली आहे. उगीचच कोणी त्याविषयी संभ्रम पसरवू नये. कारखान्याकडे मागील हंगामासह 7 लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. यावर्षी तोडणी व वाहतूक मजूर कारखान्याकडे कमी आले. ही समस्या बहुतेक सर्वच कारखान्यांना आहे. तरी आम्ही खूप प्रयत्न केले. आताही मजूर कारखान्यावर येत आहेत. सध्या गाळपाचा वेग वाढला आहे. आतापर्यंत जे-जे कारखाने विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत आले, त्या सर्वांना या अडचणीतून जावे लागले आहे. कारखान्याची एफआरपी नियमित देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारखान्यात नव्याने घेतलेले कामगार नोकरी सोडून जाताना त्याच्या जागी तेथील मजदूराला तेथे काम करण्यास सांगितले, हा अपवाद वगळला तर कोठेही कामगारभरती झालेली नाही, होणारही नाही. साखर आयुक्तालयाच्या निर्देशानुसारच सगळे सुरू आहे. आजच कारखान्याच्या कामगारांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा केला आहे. कारखान्याचे एक युनिट बंद आहे त्याचे कारणे यावर्षी तोडणी वाहतूक कामगार कमी संख्येने आले आहेत. केवळ माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत तेथील विरोधकांच्या मदतीसाठी ही बदनामी केली जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.