छत्तिसगढच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना पाठवला आरसा

रायपूर – छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून आरसा पाठवला आहे. त्या आरशात मोदींनी त्यांचा खरा चेहरा पाहावा, असे उपहासात्मक आवाहन करताना लोकसभा निवडणुकीत देशाची जनता मोदींना आरसा दाखवेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

बघेल यांनी मोदींना भिंतीवरील आरशाचे पार्सल पाठवले. त्याची माहिती ट्विटरवरून देताना त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मी भेट म्हणून तुम्हाला आरसा पाठवत आहे. तुम्ही पंतप्रधान निवासस्थानात सर्वांधिक वेळा जिथून ये-जा करता तिथे तो आरसा लावा. त्या आरशात वारंवार पाहून तुम्हाला स्वत:चा खरा चेहरा दिसू शकेल. कदाचित तो आरसा न वापरता तुम्ही कचरापेटीत फेकून द्याल. मात्र, देशाची 125 कोटी जनता तुम्हाला निवडणुकीत आरसा दाखवणार आहे. त्यामुळे आरशात पाहण्यापासून तुमची सुटका होणार नाही, असे बघेल यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे. बघेल यांनी मोदींना उद्देशूून एक पत्रही लिहील आणि ते फेसबुक पेजवर पोस्ट केले. त्यात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे. मोदींनी स्वत:ला चहावाला, फकीर, चौकीदार, साहेब अशी अनेक नावे दिली. त्यामुळे मोदींना कुठल्या नावाने ओळखावे अशा संभ्रमात जनता पडली आहे. तुमचा खरा चेहरा ओळखणे जनतेच्या दृष्टीने अवघड बनले आहे. खोटेपणाचा आणखी मुखवटा परिधान करून तुम्ही जनतेपुढे येण्याआधी मी तुम्हाला आरसा पाठवत आहे, असे त्यात बघेल यांनी म्हटले. बघेल यांच्या कृतीचे अनुकरण करत छत्तिसगढमधील कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी त्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनाही आरसे पाठवले.

मोदींनी आधीच कॉंग्रेसला आरसा दाखवला आहे-भाजप
बघेल यांच्या कृतीवरून भाजपने कॉंग्रेसवर पलटवार केला. संबंधित कृती म्हणजे हीन मानसिकतेचे राजकारण आहे. खरेतर, बघेल यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आरसा पाठवायला हवा होता. जामिनावर बाहेर असणाऱ्या राहुल यांनीच आरशात पाहण्याची गरज आहे. मोदींच्या प्रतिमेशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. मोदींनी याआधीच कॉंग्रेसला आणि दहशतवाद्यांनाही आरसा दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.