मेढा – करंजे (ता. जावळी) येथील कीर्तन महोत्सवात जगदगुरू संत तुकोबारायांचे चौदावे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर यांच्या कीर्तनाला हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कीर्तनात दंग होऊन देहभान हरपून तल्लीन होऊन हरिनामाचा गजर करताना बघायला मिळाले. तुकोबारायांचे वंशज व शिवाजी महाराजांचे वंशज कीर्तनात एकत्र आले. हा योगायोग म्हणावा लागेल. कर्म, धर्म, योगाने हा योग जुळून आल्याचे हभप पुंडलिक महाराज देहूकर यांनी सांगितले.
कै. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजे येथे संतांच्या वंशजांचा भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवात पुंडलिक महाराज देहूकर तिसरे कीर्तन पुष्प सादर करत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समोर सामान्य माणसांप्रमाणे माणसांमध्ये मांडी घालून बसले होते. कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या कीर्तनाने झाला. दुसऱ्या दिवशी संत एकनाथ महाराज यांचे वंशज हभप योगिराज महाराज पैठणकर यांचे कीर्तन झाले. तिसऱ्या दिवशी हभप पुंडलिक महाराज देहूकर यांनी कीर्तन सेवा समर्पित केली. तर चौथ्या दिवशी माउली ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिनिधि हभप गोविंद महाराज गोरे आळंदीकर यांचे कीर्तन झाले. आणि पाचव्या दिवशी कीर्तन महोत्सवाची समाप्ती सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायण व भागवत कथा प्रवक्ते हभप माधव महाराज रसाळ (पुणे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
विकासाबरोबरच भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम जावळीकरांना अनुभवण्याचे भाग्य लाभले . आ शिवेंद्रसिंहराजरेंच्या संकल्पनेतून यावर्षी संतांच्या वंशजांच्या एकत्र दर्शनाचा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ जावळीकरांनी घेतला. कै. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासाला भक्तीची जोड दिली आहे. आपले राजेपण विसरून सर्वसामान्य जनता व आपण एकच आहोत, हे शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवून दिले आहे.
– ज्ञानदेव रांजणे (सचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सातारा).
संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर कीर्तन करत होते आणि शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे ऐकत होते. हा केवळ योगायोग नाही तर हे जन्मोनजन्मीचं नातं असावं. हरिनामाची ओढ आजही राजघराण्यात कायम असल्याचा अभिमान आहे.
– हभप प्रवीण महाराज शेलार