पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पुण्यातील छत्रपती युवा संघातर्फे रक्तदान शिबीराचा कार्यक्रम घेण्यात आला. संघातर्फे घेण्यात आलेला हा नव वर्षातील पहिला कार्यक्रम आहे. या रक्तदान शिबीरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असल्याने रक्तदान शिबिर उपक्रम हा संघातर्फे दरवर्षी घेण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करुन रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली.
छत्रपती युवा संघातर्फे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हे घेतले जातात. गेल्या तीन वर्षापासून हा संघ उपक्रम राबवत आहे. रक्तदानाबरोबरच दिपोत्सव, गोर- गरिबांची मदत, वारकऱ्यांना औषधाचे वाटप देखील करण्यात येते. महाराजांच्या गड किल्ल्यांची स्वच्छता करायच्या हेतूने ऑक्टोबर २०१७ ला हा संघ स्थापन करण्यात आला. सात जणांनी सुरु केलेल्या या संघामध्ये आता अनेकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
रविवारी झालेल्या या रक्तदान शिबीरात पाच रक्तदात्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. या वेळी पुण्यातील छत्रपती युवा संघ पुणे, हिंदु तरुण मंडळ, वीर नेताजी तरुण मंडळ, रक्ताचे नाते ट्रस्ट, पै दत्ताभाऊ गोळे युवा मंच या मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते. संघातर्फे उपस्थितांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.