छत्रपती साखर कारखाना रुतला गाळात

भवानीनगर- इंदापूर तालुक्‍यात आणि बारामती तालुक्‍यात अग्रगण्य मानला जाणारा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या गाळात रुतलेला आहे. लवकरच कारखान्याची निवडणूक जाहीर होणार आहे, त्यामुळे रुतला कारखाना हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक लागण्या आगोदर गाळात रुतलेला कारखाना बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी लागणार असून विद्यमान संचालक करता तरी काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहे.सध्या हा कारखाना आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, तर गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचे वेतन झालेले नसल्याने तोही आर्थिक संकटात सापडला आहे. या दोन महत्त्वाच्या प्रश्‍नांसोबत इतर अनेक प्रश्‍न कारखान्यासमोर “आ’वासुन उभे असल्याने संचालक मंडळ प्रचंड “टेन्शन’मध्ये आले आहेत. तर हे संकट पेलून ते परतावून लावण्यासाठी अजित पवारांसह संचालक मंडळ दिवसरात्र प्रयत्न करीत असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे बोलले जात आहे.

दर पंचवार्षिक निवडणुकीत विरोधक विरोध करीत असतात; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यावर असलेला जनतेचा, सभासदांचा विश्‍वास यावर अटीतटीच्या लढतीत देखील अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या असलेल्या संचालक मंडळांचा विजय होऊन पुन्हा छत्रपती साखर साखर कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात जात आहे. परंतू, सध्याच्या येऊ घातलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांनाही ताकत मिळाली असल्याने अजित पवारांचा निवडणुकीत कस लागणर आहे.

…तर पराभव निश्‍चित
श्री छत्रपती कारखान्याला सध्यातरी उपमुख्यमंत्री अजित पवारच तारू शकतात. कारण अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी घेतलेल्या योग्य त्या सर्व निर्णयावर जनतेचा विश्‍वास आहे. आणि त्यांच्या विश्‍वासावरच विद्यमान संचालक मंडळास 28 हजार सभासदांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे या 28हजार सभासदांच्या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी अजित पवारांना काहीतरी करिष्मा करावा लागेल, अन्यथा येऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीत (विरोधक सक्षम असला तर) हाती “पराभवा’शिवाय काही लागणार नाही, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

“माळेगाव’च्या आखाड्यात हाच कळीच मुद्दा
माळेगाव कारखान्यासाठी रविवारी (दि. 23) मतदान होणार आहे. सध्या कार्यक्षेत्रात सत्ताधारी-विरोधकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून सभासदांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेला इंदापुरातील छत्रपती कारखाना सध्या गाळात रुतला असल्याने विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरल्याने तो कळीचा मुद्दा ठरला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.