पुणे – करोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून रखडलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएसनच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता मतमोजणी सुरूवात होणार आहे. मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहेत. ऍड. दौलत हिंगे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, केळी, पान आणि कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची ही संघटना आहे. यामध्ये सुमारे 880 ते 890 आडते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अध्यक्ष पदासाठी सर्व आडते थेट मतदान करणार आहेत.
अध्यक्षाबरोबर भाजीपाला विभागातून 8, फळ विभागातून 4, केळी, पान विभागातून प्रत्येकी 1 आणि कांदा बटाटा विभागातून 4 असे एकुण आठरा संचालक निवडून येणार आहेत. 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मिळणार असून, याच कालावधीत अर्ज भरायचे आहेत.
मार्केट यार्डातील पान बाजार येथील असोसिएशनच्या हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून हे फॉर्म मिळणार असून, तेथेच भरायचे आहेत. 11 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 13 डिसेंबर रोजी उमेदवारांची यादी जहिर केली जाणार आहे. 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून, उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.